क्रांती ! मोठ्या पल्ल्याची लढाई…

राळेगण सिद्धी
२९ सप्टेंबर २०११

बंधू-भगिनिंनो ,

नमस्कार,

बर्‍याच काळानंतर मी आपल्याशी थेट संपर्क साधत आहे.

यापुढे याच ब्लॉगवरुन मी आपल्याशी वेळोवेळी संपर्क साधणार आहे.

भारतात ‘जनलोकपाल विधेयक’ लागू व्हावे या मागणीसाठी मी आणि आपण सर्वांनी मिळून जे आंदोलन सुरु केले होते त्याचीच पुढे रामलीला मैदानावर क्रांतीची मशाल झाली. संपूर्ण देशातून तुम्ही – विशेषतः माझे युवक-युवती सहकारी उभे ठाकलात . बघता बघता उभ्या भारतमातेचा तिसरा नेत्र उघडला. संपूर्ण जगभरातून केवळ भारतीयच नव्हेत, तर अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचाराविरुद्ध असणारे अन्य देशवासीयहीं सक्रीय पाठिंब्यासाठी पुढे आले. बहुसंख्य प्रसारमाध्यमांनी जनतेचा हा लढा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. या सार्‍यातून  एक झंझावात उभा राहिला. ती  क्रांतीची सुरुवात होती. दुसर्‍या स्वातंत्र्यासाठीच्या लढाईचा तो प्रारंभ होता.

जनलोकपाल विधेयकासंबंधीच्या काहीं मागण्या संसदेत मांडून मान्य करण्याची ग्वाही संसदेने आपल्याला दिली. पण ग्वाही दिली म्हणजे कायदा झाला असे नाही. अजून आपल्याला बरेच लढावे लागणार आहे. सत्ताधारी वर्ग, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, भ्रष्टाचारामध्ये एवढा बुडालेला आहे की जनतेच्या हिताची आणि भ्रष्टाचाराविरोधातली कोणतीही  सूचना ऐकण्याच्या मनस्थितीत तो नाही. त्यामुळे आपल्याला अहिंसात्मक क्रांती अखंड चालू ठेवावी लागेल. तिचा ठोस कृती कार्यक्रम काय असेल आणि आपण कोणत्या दिशेने जायचे आहे, ते मी याच ब्लॉग वरुन थेट संपर्क करून आपणाला लवकरच सांगेन. तोपर्यंत काहीं गोष्टी आपल्याशी मन-मोकळे करून आपल्याला मला सांगायच्या आहेत.

दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर मी जेव्हा उपोषणाला बसलो होतो तेव्हापासून सरकारने आणि सत्ताधारी वर्गातल्या काहीं घटकांनी माझ्याबद्दल आणि आंदोलनाबद्दल अनेक अफवा पसरवण्याचे उद्योग केले. जेणेकरून तुमच्या मनात आंदोलनाबद्दल आणि अण्णांबद्दल  गैरसमज निर्माण व्हावेत आणि क्रांतीची मशाल पेटत जाण्याअगोदरच विझावी. परंतु त्यांचे प्रयत्न सुदैवाने आणि तुम्हा सार्‍या भारतीय बांधवांच्या शहाणपणामुळे फोल ठरले. तरीहीं क्रांतीच्या प्रक्रियेत खोडा घालण्याचे काहीं व्यक्तींचे आणि शक्तींचे प्रयत्न सुरूच आहेत आणि यापुढेहीं ते थांबतील असे नाही. माझ्या उपोषण सोडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत जेव्हा बोलणी होत होती तेव्हा सरकारतर्फे जी माणसे आमच्या टीम मधल्या ज्यांना भेटत होती, त्यातला प्रत्येक माणूस, प्रत्येक मंत्री, प्रत्येक वेळी वेगळे बोलत होता. वेगळे आश्वासन देत होता. शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलन मोडण्यासाठी असा खेळ चालू होता. सरकारतर्फे वाटाघाटी करण्यासाठी माझ्यापर्यंत जी माणसे येत होती आणि आली त्यातली कोण स्वच्छ चारित्र्याची होती आणि कोण भ्रष्ट होती याची शहानिशा सरकारने करायला हवी होती. मी त्यांच्याशी चर्चा केली ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून. स्वच्छ माणसे कुठून आणणार असा प्रश्न सरकारला पडला होता का, हे सरकारलाच माहित. माझ्या दृष्टीने ती माणसे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी. ती काहीं चळवळीवर उपकार करायला आली नव्हती ! त्या व्यक्ती, ते नेते सरकारकडून निरोप घेऊन येत होते. आमच्याकडून निरोप घेऊन जात होते. सर्वात शेवटी मी उपोषण सोडले ते माझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवून आणि सरकारकडून ठोस आश्वासन आल्यावरच ! हे मी इथे लिहित आहे कारण आपणच सगळे काहीं घडवून आणले असा आभास आणि प्रचार काहीं मध्यस्थ म्हणवून घेणार्‍यांनी त्यांच्या लाडक्या मंत्री-महोदयांना श्रेय देण्यासह केल्याचे माझ्या निदर्शनास आणण्यात आले आहे. स्वतःचे गोडवे गाणारे लेख, मुलाखती त्यांनी प्रसिध्द केल्या. परंतु तो  सगळा धादांत खोटा प्रचार आहे. सत्याच्या लढाईत आजवर मी कधीच मनाला न पटणारे निर्णय घेतलेले नाहीत. आपणच आंदोलन मिटविल्याचा दावा करणारे भारतीय जनतेच्या आणि स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईच्या विरोधात काम करीत आहेत, असे म्हणावे लागेल. भ्रष्टाचारविरोधी लढा संपविण्यासाठी भ्रष्टाचाराचाच अवलंब करण्याचा प्रयत्न काहीं मंडळी करीत आहेत असे यातून दिसत आहे. हा धोका लक्ष्यात घेऊन आपणा सर्वांना सदैव सावध रहावे लागेल.

उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत संपूर्ण भारताने ज्या आंदोलनाला पाठिंबा  दिला, ते आपले आंदोलन, मी उपोषण सोडल्याने संपलेले नाही. उलट हीं तर सुरुवात आहे. लांब पल्ल्याची हीं लढाई आहे. ती दिवसेंदिवस उग्र होत जाईल आणि नेटाने ती लढावी लागेल. सरकारला आणि सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना भारतीय जनतेच्या मनात त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आणि त्यातून ते करत असलेल्या ऐयाशिन्बद्दल किती राग खदखदतो आहे याची कल्पनाच नाही. ती कल्पना त्यांना लवकरच या देशातील एकूणच जनता आणि विशेषतः युवक-युवती आणून देतील असा माझा विश्वास आहे.

आपणा सर्वांशी थेट संवाद साधण्यासाठी मी लवकरच संपूर्ण देशाचा दौरा सुरु करणार आहे. तसेच विविध विषयांवरचे, देशातल्या पिचलेल्या जनतेच्या विविध समस्यांवरचे माझे विचार मी या ब्लॉगवर, माझ्या या ब्लॉगसाठी मी निवडलेल्या सदस्यांच्या माध्यमांतून मांडणार आहे. आपणहीं याच ठिकाणी माझ्याशी संवाद साधू शकाल अशी व्यवस्था लवकरच करण्यात येईल.

त्या त्या वेळी संबंधित विषयावर माझे अधिकृत विचार तुम्हाला आता या ब्लॉगवर वाचायला मिळतील.

माझे हे प्रारंभीचे मनोगत संपवण्याअगोदर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि भारतीय जनतेच्या वतीने ब्रम्ह्देशाच्या (म्यानमार) महान, त्यागी आणि नोबेल पारितोषिक विजेत्या नेत्या Aung San Suu kyi यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी आमच्या लढ्याला ‘टाइम्स नाऊ’ या वाहिनीच्या माध्यमातून पाठिंबा दिला. Aung San Suu kyi यांचा ब्रम्ह्देशातील (म्यानमार) हुकूमशाही विरोधी लढा हा जगाच्या इतिहासातील एक महान लढा आहे. त्यालाहीं आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

तूर्तास इथेच थांबतो.

पुन्हा भेटू. सातत्याने.

भारत माता की जय ! जय हिंद ! इन्किलाब झिंदाबाद !

This entry was posted in Post in Marathi. Bookmark the permalink.