राळेगण सिद्धी,
१० ऑक्टोबर , २०११.
बंधू-भगिनिंनो ,
नमस्कार,
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या असामान्य कर्तुत्वाने क्रांती करणारे महान संशोधक श्री.स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनाचे वृत्त दुख:दायक आहे.
जगातील तंत्रज्ञान क्रांतीच्या शिल्पकारांपैकी स्टीव्ह हे एक बिनीचे शिलेदार होते. त्यांनी संशोधन केले ते जग जवळ आणण्यासाठी. जगातील नाना देशांमधील नाना प्रकारच्या आणि विविध स्तरांमधील लोकांना परस्परांशी संपर्क आणि संवाद साधण्याचा मार्ग खुला करून देण्यातील त्यांचा वाटा अविस्मरणीय आहे. त्यांच्यासारख्या संशोधकांनी कल्पकतेने आणि भविष्याचा वेध घेऊन केलेल्या क्रांतिकारक कार्याला आधुनिक जगाच्या इतिहासात फार महत्वाचे स्थान आहे आणि राहील. गेल्या काहीं वर्षांमध्ये जगातील काहीं देशांमध्ये घडलेल्या घडामोडींनी ते दाखवून दिले आहे.
लोक-जागृती आणि लोक-संघटन यात या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो आणि दबल्या-पिचलेल्या, अन्यायग्रस्त, भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या जनतेचा आवाज प्रभावीपणे व्यक्त होण्यासाठी हीं तंत्रज्ञान क्रांती कशी आणि किती सहाय्यभूत ठरते, हे मी स्वतः अगदी अलीकडच्या आमच्या ‘जनलोकपाल विधेयका’ साठीच्या आंदोलनात अनुभवले आहे. यापुढेही त्याचा प्रत्यय येत राहील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
स्टीव जॉब्स गेले ! देहरुपाने गेले, पण कार्यरूपाने ते अमर आहेत. “मरावे परी, कीर्तिरूपे उरावे” या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे ते आधुनिक जगात सदैव, पदोपदी आपल्या सोबत असणार आहेत. तंत्रज्ञानाच्या आत्म्यास आणि त्यामागच्या माणसाला आणि किमयागाराला शतश: प्रणाम.
माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली.
कि. बा. हजारे (अण्णा)
You must be logged in to post a comment.