क्रांतीचा प्रवास !

राळेगण सिद्धी,
१४ ऑक्टोबर २०११. 

माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,

नमस्कार.

 आज भ्रष्टाचार हा मुद्दा सर्वव्यापी झाला आहे. अनेक आघाड्यांवर आपल्याला लढावं लागणार आहे. या संघर्षाची दोन चाके आहेत. एक आहे संघर्षाचे – क्रांतीचे. तर दुसरे चाक आहे विकासाचे – रचनेचे. आपण आत्ता अत्यंत प्रभावशाली अश्या ‘जनलोकपाल विधेयका’ साठी लढतो आहोत. हीं लढाई इथे थांबणार नाही. देशातल्या ८० टक्क्याहून जास्त लोकांच्या जगण्याचा प्रश्न केवळ प्रशासनातील आणि राजकारणातील  भ्रष्टाचारामुळे अधिकाधिक बिकट झालेला आहे. केवळ भ्रष्टाचारामुळे विकासाला गतीच प्राप्त होऊ शकत नाही. सामान्य माणसाचे जगणे दिवसेंदिवस मुश्कील होत चालेलेले आहे. सरकार आणि देशातले एकंदरीत सर्वच पक्ष या भ्रष्टाचाराचे छुपे समर्थन करत आहेत, असे मला वाटू लागलेले आहे. अन्यथा ‘जनलोकपाल विधेयका’ संबंधात सर्व पक्षांत उघड पाठिंब्याची भूमिका घेतली गेली असती आणि त्या दृष्टीने सकारात्मक वारे सर्व पक्षात देशभर वाहू शकले असते. अर्थात फक्त राजकीय पक्ष म्हणजे देश नव्हे. खरे तर देश म्हणजे देशातली जनता. ती सार्वभौम आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर, ‘जनलोकपाल विधेयक’  आणावेच लागेल. सरकार कुणाचेहीं असो, ते विधेयक   येईलच. राज्या-राज्यातल्या सरकारांना सुद्धा त्याबाबत कायदे अधिक कठोर करावेच लागतील.

पण आपला संघर्ष ‘जनलोकपाल विधेयका’ पाशीच संपणार नाही. यानंतरचा लढा हि त्याहून बिकट असणार आहे. “Right to Reject (लोक प्रतिनिधींना नाकारण्याचा) आणि “ Right to Recall (लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा) ” यासाठी हा लढा आपल्याला पुढे न्यावाच लागेल. तो चालवावा लागेल. “Right to Reject” (लोक प्रतिनिधींना नाकारण्याचा) म्हणजे आपल्या मतदार संघातले, सर्वच उमेदवार आपल्याला नापसंत असतील तर मतदार आपला ” Right to Reject” (लोकप्रतिनिधींना नाकारण्याचा) चा हक्क बजावू शकतील. मतदारांनी “Right to Reject” (लोकप्रतिनिधींना नाकारण्याचा) च्या बाजूने मतदान केले तर जनतेने ज्यांना नाकारले आहे, त्यांना पुन्हा निवडणुकीला उभे राहता येणार नाही. त्यामुळे यातून सर्वच राजकीय पक्ष हि नवा धडा शिकतील. त्यांना मतदारांसाठी स्वच्छ आणि चारित्र्यवान उमेदवार देणे भाग पडेल. “ Right to Recall” (लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा) हे तर त्यापुढचे पाऊल आहे. आपणच  निवडून दिलेला उमेदवार भ्रष्ट, अपात्र निघाला तर त्याला लोकप्रतिनिधी पदावरून परत बोलावण्याची तरतूद या कायद्यात असेल. त्यामुळे आत्ताप्रमाणे असे लोकप्रतिनिधी पाच वर्षांकरता ‘बेलगाम’ सुटणार नाहीत.

अर्थात, जनतेने हे सुद्धा लक्ष्यात घ्यायला हवे की नुसते कायदे करून क्रांती होत नाही. क्रांती हा तुमच्या मानसिक आणि राजकीय प्रक्रियेचा भाग आहे. भ्रष्टाचार हा काही फक्त राजकारणातच नाही. तो तर भारतात सर्वव्यापी झालेला आहे. भ्रष्टाचार प्रशासनात आहे, भ्रष्टाचार न्याय-व्यवस्थेत आहे. भ्रष्टाचार हि आपली जणू ६४ वर्षांची दु:ख-विकृती झालेली आहे. जणू आपल्याला शाश्वत विकास नकोच आहे! मी अजिबात विकास -विरोधी नाही. आपल्याला विकास हवाच आहे. चांगल्या मार्गाने संपत्तीची निर्मिती करणारे अनेक उद्योजक आज आपल्या देशात आहेत. पण बेसुमार सरकारी भ्रष्टाचारामुळेच त्यांना समतोल निर्माण करणाऱ्या संपत्तीची निर्मिती आणि देशाचा विकास करताच येत नाही. जंगलांची बेसुमार कत्तल, बेकायदेशीर खाणकाम, शेतजमीन आणि सरकारी जमिनींवर बेकायदेशीर अतिक्रमण हा उद्योगहीं नव्हे आणि विकास तर निश्चितच नव्हे. शाश्वत विकास हा मानवाचे आणि निसर्गाचे शोषण न करता संपत्तीची अधिकाधिक निर्मिती करणारा असला पाहिजे. त्यासाठी समविचारी जनतेने अहिंसक मार्गाने आपली रस्त्यावरची ताकद आणि प्रेरणा वाढवली पाहिजे. आज भ्रष्टाचाराच्या वखवखीमुळे देशातला शेतकरी आत्महत्या करतो आहे. कामगार बेकार होतो आहे. उद्योजक एकीकडे मंदी आणि दुसरीकडे प्रशासनातील आणि राजकीय पातळीवरचा भयानक भ्रष्टाचार यात अडकला आहे. कुणीच सुखी नाही अशी एक व्यवस्था ६४ वर्षात राजकारण्यांनी उभी केली आहे. ती व्यवस्था परिवारवादाच्या ‘राजेशाही’ वर नि सरंजामशाहीवर उभी आहे. आपल्या राजकारण्यांनी निवडणुकीच्या लोकशाही माध्यमातून नवसरंजामशाही देशात विकसित केली आहे. आज प्रामाणिक सामान्य माणसाला किंवा सामान्य राजकीय कार्यकर्त्याला सत्तेच्या शिडीवर चढण्याचा मार्ग अरुंद झाला आहे किंवा बंदच झाला आहे अस मी म्हणेन. मुले, भाचे, मुली, पुतणे इतर नातेवाईक ह्यांच्या माध्यमातून सत्ताधारी असलेल्या बलदंड परिवारांनी आपली सत्ता राज्य-राज्यातून सर्व पक्षातून आणि देशभर पसरवत नेलेली आहे. ज्या लोकशाही साठी आपल्या पूर्वजांनी आपले आयुष्य बलिदान केले ती लोकशाही हीच का आहे? हे जनतेला मोडून काढावेच लागेल. त्यालाच मी ‘क्रांती’ म्हणतो. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केले, त्यांना हि आजची व्यवस्था अपेक्षित नव्हती. म्हणून तर ते गोऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढले. आज आपल्याला पिळवणूक करणाऱ्या आपल्याच स्वकियांविरुद्ध  लढावे लागत आहे. प्राणपणाने आपण ती लढणार आहोत, हा निर्धार करूया.

हि एका नव्या क्रांतीची सुरुवात असेल. ६४ वर्षांमध्ये जे घडले नाही ते आता या देशात घडणार आहे, यावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा ! देशावर निष्ठा ठेवा !!

आता आपल्याला एका दुरगामी, कठीण आणि तीव्र अश्या लढ्याला सज्ज व्हायला हवे.

इन्किलाब झिंदाबाद !! वंदे मातरम ! भारत माता की जय ! जय हिंद!

कि. बा. हजारे (अण्णा)

This entry was posted in Post in Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s