माझ्या आदरणीय शत्रुंसाठी माझी अकथ कहाणी !

राळेगणसिध्दी

२०.१०.२०११

माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,

नमस्कार.

गेली अनेक वर्षे आमच्या संस्था आणि माझ्याबद्दल उलट सुलट चर्चा चालू आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे, या संबंधाने जनतेची दिशाभूल होत असल्यामुळे जनतेच्या माहितीसाठी हा खुलासा करीत आहे.

 सन १९६२ मध्ये अचानकपणे चीनने आपल्या देशावर हल्ला केला. त्यामध्ये आपल्या देशाची फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली. देशासाठी काहीतरी करावे, या उद्देशाने १९६३ मध्ये मी लष्करात भरती झालो. जीवनामध्ये अन्याय, अत्याचार सहन करायचा नाही अशी पूर्वीपासूनचीच भूमिका असल्याने १२ वर्षांच्या लष्करी सेवेमध्ये ११ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बरोबर जवानांच  भोजन, निवास व इतर प्रश्नांवरून झगडावे लागले. अशा कृतीमुळे जवानांच्या मनात माझ्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली व त्यांनी  माझे ‘शास्त्रीजी’ असे टोपणनाव ठेवले होते.

१२ वर्षे लष्करात काम करताना बहुतांश काळ देशाच्या सीमावर्ती भागात गेला. सिक्कीम, भूतान व नेपाळचा सीमेवरील भाग, लेह, लडाख, काश्मीर, मिझोराम, बंगाल, आसाम व हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात सेवा केली. जवानांच्या हितासाठी सतत झगडत असल्याने जाणीवपूर्वक मला दुर्गम भागात पाठवले जात असे. परंतु, देशसेवा करण्याच्या उद्देशानेच लष्करात गेलेलो असल्याने माझ्या मनाला कधीही थकवा आला नाही. कितीही कष्ट व हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी आपल्या देशासाठी आपण हे करत आहोत असे समजून १२ वर्षे लष्करात सेवा केल्यानंतर मी पेन्शनचा हक्कदार झालो. ‘जय जवान’ ही भूमिका आपण देशासाठी पार पाडली आहे, आता ‘जय किसान’ ही भूमिका पार पाडण्यासाठी मी लष्करी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली.

निवृत्तीनंतर गावी आल्यावर पाहिले तर माझ्या गावाची अवस्था फारच वाईट होती. गाव दुष्काळग्रस्त असल्याने पाण्याची टंचाई, अन्नधान्याची टंचाई, जवळपास ८०% लोक उपाशीपोटी झोपत होते. गावात खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही म्हणून गावापासून ४ ते ५ किलोमीटरवर दुसऱ्या गावी दररोज मोलमजुरीसाठी लोक जात होते. कुठलेही उत्पन्नाचे साधन नसल्याने बर्‍याच लोकांनी गावामध्ये हातभट्टीची दारू गाळण्याचा व्यवसाय सुरू केलेला होता. अनेक दारूच्या भट्ट्यांमुळे गावातील वातावरण दूषित झालेले होते.

स्वत:च्या गावाची ही अवस्था पाहून मन व्यथित झाले आणि आपल्या गावाला या दुष्टचक्रातून बाहेर काढायचे असे ठरविले. ग्रामस्थांच्या मदतीने गावातील दारूच्या भट्ट्या बंद केल्या, त्यांना उपजिविकेसाठी पर्यायी व्यवसाय सुरू करून दिले. पाणलोटक्षेत्र विकासाचे छोटे-छोटे कार्यक्रम केले. त्यातून गावचे भौगोलिक, आर्थिक व सामाजिक परिवर्तन झाले. ज्या गावात ३० ते ३५ दारूच भट्ट्या होत्या, त्या गावात गेल्या २० वर्षांमध्ये कोणत्याही दुकानात बीडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू मिळत नाही. हातभट्टीसाठी पंचकोशीत प्रसिद्ध असलेल्या गावातून आज दररोज सुमारे पाच हजार लिटर दूध दररोज गावाबाहेर जात आहे. गावातील ३०० एकर जमिनीवर पूर्वी फक्त एक पिक कसेबसे होत होते, तिथे पाणलोट क्षेत्र विकासानंतर १५०० एकर जमिनीवर दोन पिके घेता येऊ लागली आहेत.

यामुळे गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण झाले. आज गावात कोणीही उपाशी नाही, उलट गावातून शहरामध्ये दूध, भाजीपाला व अन्नधान्य यांची निर्यात होऊ लागली आहे. आज गावात शेतावर काम करण्यासाठी मजूरसुद्धा मिळेनासे झाले आहेत. गावात पूर्वी चौथीर्पंत शिक्षणाची सोय होती. आज गावातील मुलामुलींची कला, शास्त्र व वाणिज्य या शाखांमधून कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिक्षणाची सोय झाली आहे. या शैक्षणिक कामासाठी गावातील आठ शेतकर्‍यांनी आपली १२ एकर जमीन संस्थेला बक्षीसपत्र करून दिली आहे. शाळा, वसतीगृह, मंदिर, समाजमंदिर यासारख्या कोट्यावधी रुपये किमतीच्या इमारती ग्रामस्थांनी स्वत:च हिमतीवर उभ्या केल्या आहेत. गावकरी बाहेरच्या कोणत्याही उद्योगपतीची किंवा परदेशातील कोणाचीही देणगी घेत नाहीत. शाळेतील विद्यार्थी दरवर्षी क्रिडा क्षेत्रामध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. क्रिडा क्षेत्रामध्ये आमच्या काही विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

१९७५ मध्ये या विकासकामांना सुरुवात केली. जनसहभागामुळे या कामात चांगले यश आले. परंतु, विकासकामांना भ्रष्टाचाराची गळती लागली आहे. एक रुपयातील दहा पैसेही गावातील कामार्पंत पोहचत नाहीत, हे लक्षात आले. त्यामुळे १९९० पासून भ्रष्टाचार थांबविण्याच्या हेतूने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. याच कामासाठी सन १९९७ मध्ये भ्रष्टाचारविरोधी जन-आंदोलनाची स्थापना केली. कारण देशातील रचनात्मक कामांना गती देणे व भ्रष्टाचार थांबविणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्या देशाला आणि समाजाला उज्ज्वल भवितव्य मिळणार नाही, असे अनेक वर्षांच्या अनुभवांनंतर माझे मत बनले आहे. त्यामुळे एकाच वेळी ही दोन्ही कामे मी सुरू ठेवलेली आहेत. ही कामे करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. परंतु, चांगले काम करत असताना अनेक वेळा आरोप-प्रत्यारोप होवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अनेक जणांकडून केला जातो.

युती सरकारच्या (सेना-भाजप) काळात काही मंत्र्यांनी आमच्या हिंद स्वराज्य ट्रस्ट या संस्थेवर दि. २७ एप्रिल १९९७ रोजी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आमच्या संस्थेवर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून मी दि. १० मे १९९७ रोजीपासून उपोषण सुरू केले आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी धर्मादाय आयुक्तांमार्फत हिंद स्वराज्य ट्रस्टची चौकशी केली आणि दि. १९.०५.९७ रोजी लिहून दिले, की हिंद स्वराज्य ट्रस्टच्या कामात कोणताही अनियमितपणा किंवा भ्रष्टाचार झालेला नाही.

युती सरकारच्या काळात भ्रष्टाचार उघड केल्यामुळे काही मंत्र्यांना राजीनामे देण्याची वेळ आली. नंतर युती सरकारने मला जेलमध्ये टाकले. परंतु, महाराष्ट्रभर लोक उभे राहिले व जनमताच्या रेट्यामुळे  सरकारने माझी शिक्षा माफ करून मला जबरदस्तीने तुरुंगाच्या बाहेर काढले.

सन २००३ मध्ये सुरेश जैन व इतर मंत्रांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे हाताशी आल्याने कार्यवाही करावी म्हणून सरकारशी वेळोवेळी १५ ते २० वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, सरकारने कार्यवाही केली नाही म्हणून दि. ९ ऑगस्ट २००३ रोजी उपोषण सुरू झाले. मंत्र्यांची चौकशी केली, तर त्याबरोबरच अण्णा हजारेंचीही चौकशी करावी, असा आग्रह मंत्र्यांनी धरला त्यासाठी त्यांनी उपोषण केले.

चार मंत्री आणि माझी चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च नायालयाचे निवृत्त नायाधीश मा. पी.बी.सावंत यांचा चौकशी आयोग दि. ०१ सप्टेबर २००३ रोजी नेमला. सव्वा वर्ष दररोज सकाळी ११ ते सांकाळी ५ या वेळेत आोगाचे काम चालू होते. 

सावंत आोगाचे कामकाज सुरू असताना मंत्र्यांनी आमच्या संस्थेची कागदपत्रे तपासणची परवानगी आयोगाकडे मागितली. दि. ०९.०६.२००५ रोजी आयोगाने यासंबंधी आमचे म्हणणे मागितले असता आम्ही आमच्या संस्थेची सर्व कागदपत्रे तपासण्याची परवानगी मंत्र्यांना दिली. मंत्र्यांतर्फे सहा चार्टड अकाउंटंट्सची टीम येवून आमच्या संस्थांच्या कागदपत्रांची तपासणी सहा दिवस करण्यात आली. त्यांना जी-जी कागदपत्रे हवी होती, ती-ती त्यांना देण्यात आली. त्यांनी सुमारे अर्धा टेम्पोभर कागदपत्रे झेरॉक्स करून नेली. मात्र, शंभर रूपयांचाही भ्रष्टाचार त्यांना सापडला नाही किंवा गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सापडले नाहीत.

आमच्या संस्थेमध्ये अनियमितता झाल्याबद्दल सावंत आोगाने मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची साक्ष घेतली असता त्यांनी जबाब दिलेला आहे, की अशा अनियमितपणाबद्दल आम्ही कोणतही संस्थेवर आजपर्यंत कार्यवाही केलेली नाही. कारण, प्रत्येक संस्थेमध्ये अशा अनियमितता होत असतात.

सावंत आोगाने आपला अहवाल दि. २३.०२.२००५ रोजी शासनास सादर केला. चार मंत्र्यांपैकी श्री. विजकुमार गावित यांना आयोगाने दोष कमी म्हणून सोडून दिले. श्री सुरेश जैन, श्री पद्मसिंग पाटील व नबाब मलिक या तीन मंत्र्यांच्या संबंधाने भ्रष्टाचार कसा झाला हे आयोगाने आपल्या अहवालात स्पष्ट केले. आमच्या संस्थांवर कागदपत्रे वेळेवर न दिल्याचे किरकोळ दोष आयोगाने लावले.

सावंत आयोगाच्या अहवालात दोषी आढळलने तीन मंत्र्यांना दि. १० मार्च २००५ रोजी राजीनामे द्यावे लागले.

सावंत आोगाने दोषी ठरविलेल्या मंत्र्यांना निर्दोष सोडण्याच्या हेतूनेच सरकारने सावंत आयोगाच्या अहवालावर दि. २५.०४.२००५ रोजी सुकथनकर समितीची नेमणूक केली. सुकथनकर समितीने दि. २२ सप्टेबर २००५ रोजी आपला अहवाल सरकारला दिला. त्यामध्ये केवळ एका मंत्र्याला दोषी धरण्यात आले. माझ्यासहीत इतर सर्वांना निर्दोष सोडणत आले.

सदरची सुकथनकर समिती नियमबाह्य असल्याने निर्णय ग्राह्य धरण्यात येवू नयेत असा आग्रह आम्ही शासनाकडे धरला. उच्च नायालयानेही पी.बी. सावंत आयोगाच्या अहवालाप्रमाणे कार्यवाही करावी असा आदेश सरकारला दिला. पण सरकारने कार्यवाही केली नाही म्हणून दि. २५.१२.२००५ पासून आम्ही उपोषणास सुरूवात केली. दि. ०३.०१.२००६ रोजी महाअभियोक्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून  कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले. परंतू कार्यवाही न झाल्याने दि. ०२ ऑक्टोबर २००९ रोजी सावंत आयोगाच्या अहवालानूसार आमच्यासहीत सर्वांवर सरकारने कार्यवाही करावी म्हणून पुन्हा उपोषन सुरू केले. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना सावंत आयोगाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले व दि. ०९.१०.२००९ रोजी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सावंत आयोगाच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल असे पत्र आम्हाला दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. इतका पाठपुरावा करूनही दोषी मंत्र्यांवर सावंत आयोगाच्या अहवालानुसार आजपर्यंत कार्यवाही झालेली नसुन सदर दोषी मंत्र्यांना सरकारने पाठीशी घातलेले आहे. दि. १० आक्टोबर २०११ रोजी मा. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री यांना मी पत्र लिहून कळविले आहे की, पी.बी.सावंत आयोगाच्या अहवालाप्रमाणे तीन मंत्र्यांसहीत आमच्याही अनियमितपणाबद्दल चौकशी करून आम्हा सर्वांवरच कायदेशीर कार्यवाही करावी नाहीतर नाईलाजास्तव मला पुन्हा आंदोलन करावे लागेल.

दोषी असलेल्या सदरच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माझ्यावर कोर्टामध्ये दावे दाखल केलेले आहेत. उद्देश हाच की मला त्यात अडकवून ठेवायचे व कोर्ट कामानिमित्त महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मला चकरा मारायला लावायच्या, पण अनेक वकील लोक माझ्याकडून एक रूपयाही फी न घेता या वेगवेगळ्या केसेस आजही चालवित आहेत.

नुकताच दि. १४.०८.२०११ रोजी मनिष तिवारी या खासदारांनी सावंत आयोगातील आमच्या अनियमितपणाचे मुद्दे घेवून माझ्यावर  भ्रष्टाचाराचे आरोप केले, अण्णा हजारे हे डोक्यापासून तर पायापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेले आहेत असे सांगीतले. मात्र आमची बदनामी केली म्हणून वकीलांमार्फत त्यांना नोटीस पाठविली असता त्यांनी आपली चूक मान्य करून लेखी माफी मागीतली आहे. मी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या चारित्र्याला इतके जपलेले आहोत की त्याला तिळाएवढासुध्दा डाग लागू दिलेला नाही.

बरेच लोक आमच्या संस्थांवर कारण नसताना नाहक आरोप प्रत्यारोप करीत असतात. परंतू आमच्या संस्थांनी समाज आणि देशाच्या दृष्टीने केवढे महत्त्वाचे कार्य केले आहे याचा विचार करीत नाहीत. एवढ्या लहान गावात झालेली कामे पाहण्यासाठी देशविदेशातून लोक भेटी देत असतात. आजर्पंत सुमारे सहा लाख लोकांनी गावाला भेट देवून प्रेरणा घेतलेली आहे. पाच लोकांनी गावच्या विकासकामांवर पी एचडी केलेली आहे. सरकारने मला पद्मश्री, पद्मभूषण दिले. पण काही लोकांना हे सगळे दिसत नाही ही दुर्देवी बाब आहे. ज्या रंगाचा चष्मा डोळ्यांना लावावा त्या रंगाचे जग दिसते तशातला हा प्रकार आहे. ज्या ज्या लोकांना आमच्या संस्थेच्या कार्याबद्दल शंका असतील अशा लोकांनी प्रत्यक्ष पहाणी करावी, त्यांना काही शंका असतील तर त्या शंकांचे निरसन केले जाईल. मात्र कारण नसताना उलट सुलट चर्चा करणे योग्य नाही असे मला वाटते.

इन्किलाब झिंदाबाद !! वंदे मातरम ! भारत माता की जय ! जय हिंद!

कि.बा. हजारे (अण्णा)This entry was posted in Post in Marathi. Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s