राळेगणसिध्दी
२४ ऑक्टोबर २०११
किरण बेदीवर हवाई प्रवासामध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत, किरण बेदींनी वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की, हवाई प्रवासामध्ये मी भ्रष्टाचार करून माझ्या कुटुंबासाठी पैसा वापरला असला तर सरकारकडे ज्या चौकशी यंत्रणा आहेत, अशा यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी आणि मी दोषी असेन तर माझ्यावर कठोर कार्यवाही करा.
मात्र अशी चौकशी करायला सरकार तयार नाही, फक्त आरोप करून बदनाम करणे एवढयाच उद्देशाने काही लोकांनी उद्योग सुरू केलेला दिसतो. किरण बेदीवर झालेला आरोप हा नवीन आरोप नाही. तर ‘टीम अण्णा’मधील प्रत्येक जणावर आरोप करून ‘टीम अण्णा’ला बदनाम करण्याचा प्रयत्न या चौकडीकडून झालेला आहे. ही आरोप करणारी मंडळी कोण? ज्यांना ‘ जनलोकपाल’ बिल नको आहे. अशीच मंडळी या आरोप करणार्यांमध्ये असल्याचे दिसून येते.सुरवातीपासूनचे उदाहरण पाहिले तर लक्षात येईल की , जेव्हा ‘जनलोकपाल’ बिलाचा मसुदा करण्यासाठी संयुक्त समिती करावयाची होती. त्या संयुक्त समितीला विरोध करणारे कोण? लक्षात येईल की हीच चौकडी होती. नाइलाजास्तव ०५ एप्रिल २०११ रोजी जंतर-मंतरवर माझे उपोषण झाले व देशातील जनता मोठया प्रमाणावर रस्त्यावर उतरली तेव्हा त्यांची चुक त्यांच्या लक्षात आली आणि संयुक्त समिती करण्यास तयार झाले.दिनांक ४ जून २०११ रोजी रामदेवबाबांचे आंदोलन रामलिला मैदानावर चालू असतांना माझी व रामदेवबाबांची भेट दिनांक ५ जून रोजी होणार होती. आम्हा दोघांना एकत्र येऊ नये म्हणून दिनांक ४ जूनच्या रात्री दिड वाजता आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, पुरूष, मुले यांच्यावर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. निष्पाप महिलांवर लाठी चार्ज करणे हाच पुरूषार्थ आहे का? असा प्रश्न उभा राहतो. या महिलांवर लाठी चार्ज करणारे कोण होते? जे आज आरोप करतात तेच होते ना? हे लक्षात येईल.
संयुक्त समितीची नियुक्ती झाली, मात्र या लोकांना ‘जनलोकपाल’ विधेयक नको असल्याने श्री.शांती भूषण, प्रशांत भूषण यांच्यावर सिडीचे खोटे आरोप करायला या मंडळींनी सुरूवात केली, त्यावेळी सुध्दा किरण बेदीं प्रमाणे श्री.शांती भूषण, प्रशांत भूषण सांगत होते की , आम्ही दोषी असलो तर कायद्याने आमच्यावर कार्यवाही करा पण त्यांना माहित आहे की , कायदेशीर कार्यवाहीने आपला हेतू सफल होणार नाही, तर फक्त खोटे आरोप करून ‘टीम अण्णा’मध्ये फुट कशी पाडता येईल. जेणेकरून देशातील जनतेमध्ये संदेह निर्माण झाला की, पुढील आंदोलनात लोक पुढे येणार नाहीत.
‘टीम अणा’चे सदस्य निवृत्त न्यायमुर्ती श्री. हेगडेसाहेब एवढे प्रामाणिकपणे कार्य करणारी व्यक्ती ज्यांनी मुख्यमंत्र्यांनाही जेलची हवा दाखविली त्यांच्यावर आरोप करण्यात आले. कोण होते आरोप करणारे? लक्षात येईल की, हीच ४-६ जणांची चौकडी होती. अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप झाले एवढेच नाही सभेत चप्पल फेकणारे कोण होते? यांनीच उभे केलेले लोक होते. दि. १६ ऑगस्ट २०११ रोजी ‘जनलोकपाल’ विधेयकांची मागणीसाठी माझे दिल्लीमध्ये आंदोलन होणार होते. दिड महिन्यापेक्षा ही अधिक काळ आंदोलनासाठी जागा मिळावी म्हणून आम्ही सतत पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटीतून प्रयत्न करीत राहीलो.
मात्र जाणूनूबुजून दि.१५ ऑगस्ट २०११ पर्यंत आम्हाला उपोषणाची जागाच दाखविली नाही, दिल्लीमधील सर्व जागांवर खोडसाळपणे कलम १४४ लागू केला गेला. शेवटी नाइलाजास्तव आम्ही निर्णय घेतला की , आम्ही सर्व जणांनी स्वत:ला अटक करवून घ्यायची व जेलमध्ये उपोषण करायचे. या षडयंत्रामागे हीच सर्व मंडळी होती हे स्पष्ट दिसून आले आहे.
दि.१६ ऑगस्ट २०११ रोजी सकाळी साडे सहा वाजता मला घरी येऊन अटक करण्यात आली. मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता त्यामुळे घरी येऊन अटक करण्याचे काही कारण नव्हते. मात्र जाणून बुजून या मंडळींना माझ्या बदनामीचा प्रयत्न करायचा होता. दि. १६ ऑगस्टला मला अटक करण्यात येऊन तिहार-जेलमध्ये पाठविण्यात आले. अटक प्रक्रिया दुपारी चार वाजेपर्यंत पूर्ण झाली. तिहार जेलमध्ये आम्हाला नेण्यात आले, ४ वाजता आम्हाला खोली दिली,कपडे दिले आणि सहा वाजता अचानक एक अधिकारी निरोप घेऊन आला की , तुमची सजा माफ करून सुटका करण्यात आली आहे. तुम्हाला ज्या ठिकाणाहून आणले त्या ठिकाणी सोडायचे आहे.
मी आश्चर्यचकित झालो की , माझ्या आंदोलनामुळे शांततेचा भंग होईल म्हणून अटक करण्यात आली असे सरकार म्हणते आणि दोन तासात मला सोडण्याचा प्रयत्न करते असा सरकारला काय साक्षात्कार झाला की , आता माझ्या आंदोलनामुळे शांततेचा भंग होणार नाही? हे सरकार आहे की काय? असा प्रश्न मला निर्माण झाला. मनाला वाटेल तेव्हा कोणालाही अटक करायची आणि मनाला वाटेल तेव्हा त्याला सोडूनही द्यायचे, हीच लोकशाही आहे काय? रामदेवबाबाला जनतेवर लाठी चार्ज करून रात्री २ वाजता ज्याप्रमाणे विमानात घालून हरिव्दारला नेले आणि दिल्लीमध्ये येण्यासाठी बंदी घातली व ते आंदोलन थांबविले अगदी तोच डाव माझ्यावर ही चौकडी करणार होती. मला जेलमधून सोडायचे व आणले त्या घरी सोडतो म्हणून सांगायचे आणि गाडीत घालून गाडी सरळ दिल्ली एअरपोर्टला न्यायाची यासाठी एअर फोर्सचे विमान तयार ठेवले होते. त्या विमानाने मला पुण्याला न्यायचे आणि पुण्यावरून अज्ञात स्थळी नेऊन ठेवायचे जेणे करून दिल्लीमध्ये आंदोलन होणार नाही. या मागे कोण होते? जे ‘टीम अण्णा’ची बदनामी करतात तेच होते ना? कारण या चौकडीची नियत साफ नाही. मला तिहार जेलमध्येच संशय आला की ज्या अर्थी दोन तासातच माझी सुटका करण्याचे नियोजन केले होते, त्या अर्थी यामध्ये काही तरी गौड-बंगाल आहे, म्हणून मी जेलमधील त्या अधिकार्यांला सांगितले की, मी जेलमधून बाहेर जाणार नाही, ज्या अर्थी तुम्ही मला सात दिवसाची सजा दिली, त्या अर्थी मी सात दिवस तिहार जेलमध्येच राहाणार. मी बाहेर जाणार नाही.
सदर अधिकार्याने आपल्या वरिष्ठ अधिकारी डि.आय.जी यांना माझा निरोप दिला आणि त्यांनी ही सांगितले की तुम्ही जेलमधून बाहेर माझ्या ऑफीसमध्ये आल्यामुळे तुम्हाला आता परत जेलमध्ये जाता येणार नाही. मी त्यांना म्हणालो तुम्ही मला चर्चेसाठी बोलावलं आणि आता म्हणता जेलमध्ये जाता येणार नाही, ही बाब बरोबर नाही. मग मी त्यांना सांगितले जर जेलमध्ये मला जाऊ देणार नसाल तर मी जेलच्या गेटच्या बाहेरही जाणार नाही. मला धक्के मारून काढा अन्यथा उचलून गेटच्या बाहेर ठेवा. मी जेलच्या बाहेर जाण्यास नकार दिला आणि शासनामधील याच आरोप करणार्या चांडाळ-चौकडीचा डाव त्यांच्यावरच उलटला. रात्री एक वाजेपर्यंत अधिकार्यांचे शासनाशी संभाषण चालले होते. मात्र माझ्या निर्णयामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.त्यांना काहीच सूचत नव्हते. तीन दिवस मी जेलमध्ये ही नाही आणि जेलच्या बाहेरही नाही, डि.आय.जीच्या कार्यालयातच राहीलो, तीन दिवस आंघोळीची सोय नसल्याने आंघोळही केली नाही. त्यामुळे सरकारची नियत साफ नाही हे जनतेच्या लक्षात आल्याने जनता सरकारवर क्रोधित झाली. जेलमध्ये टाकण्याचे कारस्थान हे या चांडाळ-चौकडीचेच होते जे आम्हा सर्वांना सध्या बदनाम करीत आहेत.
नाइलाजास्तव सरकारला रामलिला मैदान आंदोलनासाठी द्यावे लागले. जेलमधून बाहेर पडताना जो जनसमुदाय रस्त्यावर आला होता तो ‘न भूतो न भविष्यती’ असाच होता. ज्या ज्या वेळी या मंडळांनी खोडसाळपणा केला त्या त्या वेळी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला आणि त्यांना अधिक बदनाम व्हावे लागले आहे. संयुक्त समितीमध्ये अडीच महिन्यात सात बैठका झाल्या ‘टीम अण्णा’ने केलेल्या मसुद्यावर सखोल चर्चा झाल्या आणि शेवटी हे खोडसाळपणा करणारे पलटले. ‘आम्ही तुमचा मसुदा कॅबिनेट समोर ठेऊ’ असं आश्वासन दिलं, मात्र कॅबिनेटसमोर फक्त सरकारचा मसुदा, जो कमजोर मसुदा आहे तोच ठेवण्यात आला. आमचा मसुदा ठेवलाच नाही.
मी कॉग्रेस सरकारमधील सर्वच मंत्र्यांना किंवा संपूर्ण सरकारला दोष देऊ इच्छित नाही. आज सरकारमध्येही काही चांगली माणसं आहेत, मात्र या चांडाळ-चौकडीमुळे त्यांची गळचेपी झालेली आहे हे नाकारता येत नाही. आम्ही आमच्या टीममधील सर्व सदस्यांना पत्र पाठवित आहोत की संत, महात्मे, महापुरूषांना ही जनहिताचे काम करताना त्रास सहन करावा लागला आहे. आपण या चांडाळ-चौकडीच्या आरोपांना वेळोवेळी उत्तर देऊ नये. फक्त एकदा खुलासा केला की, सत्य काय आहे हे जनतेला समजते. पुन्हा पुन्हा आपण त्या संबंधाने बोलू नये. म्हणजे समोरच्या खोटे आरोप करणार्याला काहीच करता येत नाही. जनता भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेली आहे. भ्रष्टाचार किती वाढला आहे याची जनतेला चांगली जाणीव झाली आहे. त्यामुळेच तर देशातील जनता या सरकारवर नाराज आहे.
भ्रष्टाचारामुळे महागाईचा भस्मासुर वाढला आहे, प्रापंचीक माणसाला प्रपंच करणे अवघड झाले आहे, आपण लढतो आहोत ते त्यांच्यासाठीच लढतो आहोत हे सुध्दा जनतेच्या चांगले लक्षात आलेले आहे. त्यामुळे या चांडाळ- चौकडीच्या खोडसाळपणाने केलेल्या आरोपाचा जनतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. अनेक संकटाना तोंड देत देत पुढे जावं लागेल. सत्याच्या मार्गाने जाणार्या माणसांना त्रास होतो, मात्र इतिहासात सत्य कधीही पराजित झालेले नाही हे नाकारता येत नाही. त्यामुळे आपण सत्याच्या मार्गाने चालत रहा.
आता ‘टीम अण्णा’ला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तरी ‘टीम अण्णा’मध्ये फुट पडणार नाही, या विचाराने आम्ही संघटीत झालो आहोत. खोडसाळपणाने आरोप करणारे आरोप कां करतात? त्यालाही काही कारणे आहेत. त्यांच्या हातचे अधिकार ‘जनलोकपाल’ विधेयकामुळे कमी होणार असल्याने त्यांना ते सहन होणार नाही, त्याचप्रमाणे ज्यांना या ना त्या मार्गाने ‘खाण्याची’ सवय लागली आहे आणि त्यांचे ‘खाणेच’ बंद होणार आहे अशा लोकांनाही ते सहन होणार नाही म्हणून ‘जनलोकपाल विधेयक’ (कायदा) कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा होऊ नये असाच त्यांचा प्रयत्न राहाणार आहे, त्यासाठी ‘टीम अण्णा’वर ते आरोप करतच राहाणार आहेत.
मात्र अशा विरोध करणार्या लोकांची मंत्रीमंडळामध्ये संख्या कमी आहे. मात्र गावामध्ये ज्या प्रमाणे २/४ गुंड लोक संपूर्ण गावालाच वेठीला धरतात त्यातलाच हा प्रकार आहे. सरकारमध्ये चांगल्या विचारांच्या लोकांची संख्या जास्त आहे, मात्र ते यांच्या विरोधात बोलू शकत नाही अशी अवस्था आहे. ठराविक ४/६ लोक सोडले तर कोणीही आरोप करीत नाहीत.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हिवाळी अधिवेशनात आम्ही ‘जनलोकपाल’चा कडक कायदा करू असे लेखी आश्वासनही दिले आहे, त्याचप्रमाणे प्रसार-वाहिन्यांशी बोलतांना त्यांनी आम जनतेला ‘जनलोकपाल’चा कडक कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच प्रमाणे कायदा मंत्री श्री.सलमान खुर्शीद यांनीही जनतेला खुले आम आश्वासन दिले आहे की , आम्ही हिवाळी अधिवेशनात ‘जनलोकपाल विधेयक’ हा कडक कायदा करू. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, यांच्या सरकारमघ्ये चांडाळ-चौकडीपेक्षा चांगल्या लोकांची संख्या अधिक आहे. ज्याप्रमाणे ‘टीम अण्णा’वर ही मंडळी आरोप प्रत्यारोप करीत आहेत त्यांना या देशाचे समाजाचे काहीच देणे घेणे नाही. स्वत:च्या स्वार्थापोटी ही माणसं आरोप करीत आहेत. कठोर ‘जनलोकपाल’ आणू नये म्हणून सरकारवरसुध्दा ही मंडळी दबाव आणू शकतील हे नाकारता येत नाही यांच्या विचाराचे संसदेमध्ये थोडे फार लोक विरोधी पक्षाचेही आहेत, त्यांनाही हे हाताशी धरतील हे नाकारता येत नाही.
मात्र या मंथनामधूनच लालबहादूर शास्त्रींची कॉग्रेस, वल्लभभाई पटेलांची कॉग्रेस, कामराज यांची कॉग्रेस उदयाला येईल असा मला विश्वास वाटतो. आज ‘जनलोकपाल विधेयका’ला विरोध करणार्या लोकांना जनता खडयासारखीच वेचून बाजूला करेल आणि तसं होणं, ही काळाची गरज आहे. या देशाला आणि देशातील जनतेला उज्वल भविष्य देण्यासाठी आणि भ्रष्टाचार-मुक्त भारत निर्माण करण्यासाठी ते जनतेला करावे लागेल. त्यासाठी वेळ आली तर मी सुध्दा देशभर फिरून प्रचार करीन.
मी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र पाठवून कळवित आहे की , ‘जनलोकपाल विधेयका’चा कठोर कायदा करण्यासाठी जो मसुदा तयार होणार आहे तो फक्त संयुक्त समिती पुरताच मर्यादित न ठेवता पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशातील जनतेला पाहाण्यासाठी आधी इंटरनेटवर टाकण्यात यावा जेणेकरून जनता तो पाहू शकेल. स्व.पंतप्रधान राजीव गांधीनी ७३ वी आणि ७४ घटना दुरूस्तीपूर्वी देशातील साडेपांच लाख गांवाना पत्र पाठवून ग्रामसभेचा ठराव मागविला होता. लोकशाही, प्रजातंत्र किंवा गणतंत्र जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा जनतेला विश्वासात घेऊनच कायदे करायला हवेत. पंतप्रधानांच्या आणि इतर मंत्र्यांच्या आश्वासनाप्रमाणे हिवाळी अधिवेशनापर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे ठरविले आहे. हिवाळी अधिवेशनात कायदा न झाल्यास सुरूवातीला विधानसभा निवडणूका लागलेल्या पांच राज्यात माझे दौरे सुरू होतील आणि नंतर राष्ट्रीय निवडणूकांमध्ये देशभर प्रचार करणार आहे. मात्र या अवधीमध्ये देशातील सर्व जनतेने आपापल्या ग्रामपंचायत आणि ग्रामसभेमध्ये, ‘जनलोकपाल’ विधेयक हिवाळी अधिवेशनात आणावे अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, अशाप्रकारचे ठराव करून पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राष्ट्रपतींजी यांना पाठवून द्यावेत. देशभरातून किमान ३५ ते ४० लाख ठराव जावेत. ‘जनलोकपाल’ विधेयकाचा ठराव करतांनाच राज्यासाठी ‘लोकायुक्त विधेयक’ आणावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री,राज्यपाल यांनाही ठराव पाठवावेत. ‘लोकायुक्त विधेयकां’चे आदेश भारत सरकारकडूनच जाणार आहेत. पण त्याआधी आपल्या मागणीचा ठराव आपापल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना व राज्यपालांना पाठवावा. वेळ कमी असल्याने सदर ठराव शक्या तेवढया लवकर पाठवावेत.म्हणजे खोडसाळपणा करणार्यांच्या खोडसाळपणाला आळा बसेल. भ्रष्टाचार-मुक्त भारत निर्मीतीसाठी हीच संधी आहे, ‘अभी नही तो कभी नही’!, सरकारने पुन्हा जर ‘जनलोकपाल विधेयक’ आणण्यात कसुर केली तर आज या सरकारची जे नुकसान झाले आहे त्यापेक्षाही अधिक नुकसान होईल. मात्र कठोर ‘जनलोकपाल विधेयक’ कायदा केला तर सरकारचे जे नुकसान झाले आहे ते भरून निघेल असे आमचे मत आहे. गेली २५ ते ३० वर्षे आम्ही कोणताही पक्ष, पार्टी, व्यक्ती न पाहता समाज, राज्य, राष्ट्राचा विचार करून आंदोलन केली आहेत. यापुढेही याच विचाराने पुढील आंदोलने होत राहणार आहेत.
इन्किलाब झिंदाबाद !! वंदे मातरम ! भारत माता की जय ! जय हिंद!
कि. बा. हजारे (अण्णा)
You must be logged in to post a comment.